छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील मालमत्तांचे १९९० नंतर म्हणजेच तब्बल ३६ वर्षांनंतर पहिल्यांदाच नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. मंगळवारी (दि.१४) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. बाह्य एजन्सीमार्फत हे सर्वेक्षण केले जाणार असून, यादरम्यान नागरिकांच्या मालमत्ता करात कोणतीही वाढ केली जाणार नाही, अशी ग्वाही सभागृहात देण्यात आली आहे.
मनपा हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण प्रत्येक पाच वर्षाला करणे बंधनकारक आहे; पण आतापर्यंत महापालिकेने मालमत्तांचे सर्वेक्षण केलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाबाबत महापौर समीर राजूरकर यांचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी कौतुक केले. शिवसेनेचे त्र्यंबक तुपे म्हणाले, स्पेक एजन्सीचा अनुभव वाईट आहे; पण विकासकामांसाठी पैसा उभा करावा लागेल. शहराचे हित पाहून आपण प्रशासनाच्या मागे उभे राहिले पाहिजे. अनिता घोडेले यांनीदेखील समर्थन करीत पूर्वीच्या एजन्सीचा अनुभव वाईट आहे. असे असले तरी नवीन एजन्सी नियुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहात ही चांगली बाब आहे. या एजन्सीवर नियंत्रण कुणाचे असेल याचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
नगरसेवक बालाजी मुंडे, महेश माळवतकर, माधुरी अदवंत, दामले, नवीनसिंग ओबेरॉय, शिल्पाराणी वाडकर, अर्चना निळकंठ, विश्वनाथ स्वामी, रामेश्वर भादवे, मनोज गांगवे, रशीद मामू, गणेश लोखंडे यांच्यासह ३५ पेक्षा जास्त नगरसेवकांनी या विषयावर मत व्यक्त केले. विरोधी पक्षनेते समीर साजीद यांनी प्रस्तावाचे समर्थन करताना ज्या मालमत्तांना अद्याप कर आकारणी झालेली नाही त्या मालमत्तांना प्रथम कर आकारणी करा, अशी सूचना केली. सर्व झोन कार्यालयाच्या क्षेत्रात एकाच वेळी काम सुरू करा, एक-एक पराला कर आकारणी करण्याची ही संधी आहे असा उल्लेखही केला.
दीड कोटींचा खर्च पाण्यात
भाजपचे नगरसेवक राजू वैद्य म्हणाले, महापालिकेने यापूर्वी स्पेक एजन्सीमार्फत मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. महापालिकेने या एजन्सीवर दीड कोटी रुपये खर्च केले. त्यानंतर जीआयएस मॅपिंगसाठी २० कोटी रुपये खर्च करण्यात आले, यातून एक लाख ७२ हजार मालमत्ता शोधण्यात आल्या, ते वीस कोटी रुपयेदेखील पाण्यात गेले. ’श्री मित्र’ अससाठी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले; पण कोट्यवधी रुपये खर्च कमनाही महापालिकेच्या उत्पनात वाढ झालेली नाही.
महापौरांचा इशारा
महापौर समीर राजूरकर म्हणाले, शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्यानुसार उत्पन्न गरजेची आहे. राज्यातील इतर महापालिकांनी कौतुकास्पद सुधारणा केल्या आहेत. आपल्यालादेखील निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी महापालिका या संस्थेबद्दल मातृत्वाची भावना ठेवा, प्रशासनाने नगरसेवकांनी केलेल्या सूचनांचे प्रशासनाने पालन करावे. कर आकारणी आणि फेरमूल्यांकनाच्या कामात कुचराई केली तर त्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.













